व्हीएसआरएस न्युज पुणे : अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून येत्या सोमवारपासून (ता.२) या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत. या ऑनलाइन वर्गासाठी रविवारी सायंकाळपर्यंत सुमारे ६० हजार ३६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात कला शाखेसाठी सहा हजार ८६४ विद्यार्थ्यांनी, तर वाणिज्य शाखेसाठी १८ हजार ३११ आणि विज्ञान शाखेसाठी ३५ हजार १८५ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. अकरावीच्या ऑनलाइन वर्गांसाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना “https://covid19.scertmaha.ac.in/eleventh” येथे नावनोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात हजेरी लावता येणार आहे, अशी माहिती राज्य परिषदेने दिली आहे.
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी गूगल क्लासरूम, झूम आणि यु-ट्यूब लाइव या माध्यमातून ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तांत्रिकदृष्ट्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसली तरी या कालावधीत विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे निश्चित केलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या ऑनलाइन तासिकांचा लाभ घेता येणार असल्याचे परिषदेने नमूद केले आहे.