व्हीएसआरएस न्युज -ऑटो क्लस्टर चिंचवड येथे शनिवारी या कार्यक्रमासाठी कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, सुधीर हिरेमठ,पोलीस उप-आयुक्त,गुन्हे पिंपरी-चिंचवड, सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना उपस्थित होते. या चर्चा सत्रात पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने देखील सहभाग घेतला होता. यामध्ये संघटनेकडून या बालकांसाठी जे काही सहकार्य करता येईल ते करण्याचे संघटनेचे अध्यक्ष यांनी आश्वासन दिले. या कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी पोलीस आयुक्तांना पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील विवध अडचणीचे निवेदन दिले.
संघटनेने निवेदनात खालील मुद्दे मांडलेले आहेत.
१. बालगुन्हेगार बाबत : – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेमार्फत बाल गुन्हेगारांना योग्यप्रकारे समुपदेशन व मार्गदर्शन करून जे बालगुन्हेगार अज्ञान असतील त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा तसेच जे सज्ञान असतील त्यांच्यासाठी रोजगार मेळावे घेऊन त्यांना त्यांच्या कुवती प्रमाणे काम देऊन सतत कामात गुंतवून ठेऊन समाज प्रवाहात जास्तीत जास्त कसे आणता येईल यासाठी संघटने मार्फत सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल.
२. औद्योगिक परिसरात वाढलेल्या चोऱ्यांबाबत :- पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील तळवडे, सोनवणेवस्ती, कुदळवाडी, चिखली, शांतीनगर, प्राधिकरण सेक्टर ७ व १० तसेच एम.आय.डी.सी. भोसरी, पिंपरी, चिंचवड या औद्योगिक परिसरात चोऱ्याचे प्रमाणात वाढ झालेली असून चोरटे गटागटाने येऊन सुरक्षा रक्षकाला प्राणघातक हत्याराचा धाक दाखवून चोरी करतात, सुरक्षा रक्षक निशस्त्र असल्यामुळे प्रतिकार करू शकत नाही. पोलीस उद्योजकांनाच सी.सी.टी.व्ही. बसवा, सुरक्षारक्षक ठेवा असा सल्ला देतात. वरील औद्योगिक परिसरातील बहुतांश उद्योजकांनी आपापल्या कंपनीमध्ये सी.सी.टी.व्ही.बसविलेले असून सुरक्षारक्षक देखील ठेवलेले आहेत, परंतु ज्या कंपन्यांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत त्या कंपन्यांनी संबधित पोलीस स्टेशनला सी.सी.टी.व्ही.फुटेज देऊन देखील अद्याप पर्यंत चोरांचा किवा चोरी झालेल्या मालाचा पोलिसांना तपास लागलेला नाही.
३. अट्टल गुन्हेगार चोरांवर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय करणेबाबत : -पोलीस दप्तरी औद्योगिक परिसरात चोऱ्या करणाऱ्या ज्या अट्टल गुन्हेगाराची नोंद आहे, त्यांच्यावर कायमस्वरूपी कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली पाहिजे. औद्योगिक परिसरात महिला कामगार वर्ग देखील कामाला आहे. या चोरांकडून महिला वर्गाची छेड-छाड केली जाते. त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्याची चोरी केली जाते. या चोरट्यामुळे महिला कामगारांना ओव्हर टाईमला थांबवू शकत नाही व महिला देखील ज्यादा वेळ कामावर थांबत नाही. तसेच पुरुष कामगारांना अडवून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल काढून घेतले जातात, त्यांना मारहाण केली जाते. त्यामुळे कामगारांच्या कामावर येण्याच्या व घरी जाण्याच्या वेळेत पोलीस पथकांनी गस्त घालण्याची व्यवस्था केली पाहिजे.
४. अनाधिकृत माथाडी कामगार संघटना बाबत : – तसेच वरील औद्योगिक परिसरात स्वयंघोषित अनधिकृत माथाडी कामगार संघटना या त्यांचे कामगार कामावर ठेवा व प्रोटेक्शन मनी देण्यासाठी उद्योजकांना नाहक त्रास देत असतात. कंपनीमध्ये चोरी व इतर त्रास होईल या भीतीने उद्योजक तक्रार करण्यास पुढे येत नाही.
५. कायमस्वरूपी पोलीस गस्ती पथकाबाबत : – सद्यस्थिती ही कोविड १९ असल्याने गेले मार्च २०२० पासून औद्योगिक परिसर हा कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे ५५ दिवस बंद होता. त्यामुळे उद्योजक हा फार मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे औद्योगिक परिसरातील जवळपास सर्वच कामगार हे आपापल्या गावी निघून गेल्यामुळे उद्योग चालविणे हे फार जिकरीचे झाले आहे. त्यातच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, ऑक्सिजन वायूचा होणारा अपुरा पुरवठा व वाढलेले दर यामुळे उद्योजक मेटाकुटीस आला असून त्यातच येणाऱ्या दिवाळी सणात कामगारांना द्यावा लागणारा पगार व बोनस यामुळे उद्योजकाची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक होणार असल्याकारणाने दिवाळीच्या सुट्टी कालावधीत पोलिसांनी रात्रीचे वेळेस गस्त घालून उद्योजकांना सहकार्य करावे.