व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पॉझिटिव्हीटी दर हा दुपटीने वाढला आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने चाचण्या वाढविण्यात येणार आहे. तसेच रोजच्या प्रलंबित अहवालाचा आकडा वाढत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील लॅब 24 तास कार्यान्वित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच करोनाचा अहवाल 24 तासांत उपलब्ध करून द्या असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहे.
शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयुक्तांनी आढावा बैठक आयोजित केली होती. यामध्ये महापालिकेच्या रुग्णालयांमधील सर्व प्रमुख उपस्थित होते.
आयुक्त पाटील म्हणाले, करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहे. संसर्गदर कमी करण्यासाठी चाचण्या वाढवणे आवश्यक आहे. त्याचवेळी केलेल्या चाचण्यांचे अहवाल देखील वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी कमीत कमी वेळेत अवघ्या 24 तासांत अहवाल कसे प्राप्त होतील यासाठी प्रयत्न करा. संपूर्ण शहरातील रुग्णांचे अहवाल तात्काळ उपलब्ध करून द्या.
पाच ते सहा दिवसांचे अहवालासाठी वेटिंग
सद्यस्थितीत शहरातील रुग्णांचे अहवाल मिळण्यासाठी पाचे ते सहा दिवसांचा कालावधी लागत आहे. पालिकेचे रुग्णालय व दवाखान्यांमध्ये करोनाची चाचणी केली जाते. अँटीजेन चाचणीचा अहवाल रुग्णाला पंधरा मिनिटामध्ये मिळतो. तर आरटीपीसीआर चाचणीसाठी रुग्णाच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले जातात. वायसीएम रुग्णालयात तपासणी लॅब आहे. मात्र याठिकाणी मनुष्यबळ कमी असल्याने अहवाल देण्यास उशीर होतो.