व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग कक्ष व रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या सहकार्याने शहरातील ४५ वर्षावरील दिव्यांगांसाठी स्वतंत्र कोवीड १९ लसीकरण केंद्र रोटरी क्लब सभागृह संभाजीनगर चिंचवड येथे बुधवार दि २८ एप्रिल पासून सुरू करण्यात आले.
शहरातील सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके व आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कोवीड १९ लसीकरण केंद्र शहरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. दिव्यांग •व्यक्तींसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून स्वतंत्रपणे लसीकरण केंद्र रोटरी क्लबच्या सहकार्याने सुरू करण्यात आले असून असा उपक्रम राबविणारी पिंपरी चिंचवड ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात एकूण २१४५ दिव्यांग ४५ वर्षावरील असून ते लसीकरणासाठी पात्र आहेत. नागरवस्ती विभागाकडील दिव्यांग कक्ष विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी रोटरी क्लब पिंपरी चे अध्यक्ष मेहूल परमार यांचे समवेत नियोजन केले आहे.
सर्व दिव्यांगांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली आहे. लसीकरण केंद्रावर आकुर्डी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ सुनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय पथक कार्यरत आहे. कोवीड लसीकरण हे सुरक्षित आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आज सुरू झालेल्या या मोहिमे दरम्यान उपायुक्त अजय चारठणकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जिल्हा दिव्यांग कक्षाचे समन्वयक विजय कान्हेकर, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, डॉ सुनिता साळवे, रोटरी क्लबचे अध्यक्ष मेहूल परमार, माजी अध्यक्ष परमानंद जमतानी अभिजीत शिंदे, रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षा उन्नती खिंवसरा, अपंग प्रहार आंदोलनाचे अध्यक्ष दत्ता भोसले आदींनी भेट दिली.