व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनमधून रसद पुरवली जात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य उपमहापौर केशव घोळवे यांनी महापालिकेच्या सभागृहात केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेची आज सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. सर्वसाधारण सभा सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेनेने घोषणा देत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कृषी कायद्याविरोधात सभा तहकूबीची मागणी विरोधकांनी केली. मात्र, सत्ताधारी भाजपच्या महापौरांनी सभा तहकूब करण्यास नकार दिला.
यावेळी विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना उपमहापौर केशव घोळवे यांनी हे वादरास्त वक्तव्य केले आहे. शेतकरी कायदे शेतक-यांच्या फायद्याचे असल्याचे समाजातून देताना दिल्लीत सुरू असलेल्या या शेतकरी आंदोलनास चीन व पाकीस्तानकडून रसद पुरविली जात असल्याचे म्हटले.
त्याबरोबर दिल्लीत शेतक-यांनी सुरू केलेले हे आंदोलन मँनेज केलेले असल्याचेही ते म्हणाले. आंदोलक भाडेकरु आहेत. त्यांना रोज ३०० रुपये भाड्याने आणलेले आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. दरम्यान, उपमहापौरांनी केलेल्या या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध करण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान व चीनकडून रसद मिळते. भाड्याचे लोक आणले. या प्रकारचे उदगार शेतकरी आंदोलनाबाबत भरसभेमध्ये काढून शेतक-यांची भाजपच्या उपमहापौरांनी थट्टा उडविली. ही बाब अतिशय निंदनीय असुन देशातील तमाम शेतक-यांचा अपमान करणारी आहे. त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करत असून त्यांनी शेतकरी बांधवांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सुध्दा उपमहापौर केशव घोळवे यांच्या त्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, शेतक-यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आंदोलनाचा वणवा आता पेटत चालला आहे. अशा परिस्थितीत महापालिकेतील एका जबाबदार पदाधिकार्याने अशा प्रकारे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करत असून त्यांनी शेतकरी बांधवांची माफी मागावी.