व्हीएसआरएस न्युज पिंपरी- तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चितळे यांच्याकडील भांडार विभाग काढून त्यांना उद्यान विभाग दिला होता.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विभागप्रमुखांची तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बदली केली होती. मात्र अवघ्या 20 दिवसांत नवीन आयुक्त राजेश पाटील यांनी पुन्हा खांदेपालट करत विभागप्रमुखांच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. महापालिकेचे उपायुक्त मंगेश चितळे यांच्याकडील मध्यवर्ती भांडार विभाग काढून घेऊन त्यांना उद्यान विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. केवळ 20 दिवसांत पुन्हा त्यात बदल करण्यात आला असून, त्यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना तसेच, दक्षता व गुण नियंत्रण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तसे, आदेश 12 फेब्रुवारीला काढले. तर, उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांना प्रशासन विभाग देण्यात आला. प्रशासनाचे उपायुक्त मनोज लोणकर यांना भांडार विभाग सोपविला. नवे आयुक्त राजेश पाटील यांनी केवळ 20 दिवसांत अचानक हे बदल रद्द केले आहेत. चितळे यांना आकाशचिन्ह व परवाना विभाग दिला आहे. तर, उद्यान विभाग पूर्वीप्रमाणे इंगळेंकडे दिला आहे. त्यांच्याकडे प्रशासन विभाग कायम आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्प बांधकामांची (स्थापत्य) जबाबदारी कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांच्याकडे होती. त्यांनी नुकतीच सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्या विभागाची जबाबदारी कार्यकारी अभियंता शिरिष पोरेडी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
आकाशचिन्ह विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे माहिती व जनसंपर्क आणि पशुवैद्यकीय विभाग देण्यात आला आहे. या विभागाची जबाबदारी घेतलेले व्यंकटेश दुर्वास यांनी सेवेचा राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त झाली होती.