व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
नवनगर विकास प्राधिकरणाने भोसरी सेक्टर १२ मध्ये अल्प उत्पन्न गट व आर्थिक दुर्बल घटकांसाठी चार हजार ८८३ सदनिकांचा गृहप्रकल्प उभारला आहे. त्या घरांसा शुक्रवारी (ता. २१) सकाळी आठ वाजता ऑनलाइन पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. पुण्यातील अल्पबचत भवनात हा कार्यक्रम होणार असून, त्याचे प्रक्षेपण फेसबुक व यू ट्यूबवर लाइव्ह होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्राधिकरणाने भोसरी एमआयडीसी व स्पाइन रस्त्यालगत अल्प उत्पन्न गट (एलआयजी) व आर्थिक दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प उभारला आहे. प्रकल्पातील प्रत्येक इमारत अस मजली आहे. इमारतींचे काम पूर्ण झाले असून, रंगरंगोटी व अन्य किरकोळ कामे बाकी आहेत. या प्रकल्पालगत क्रीडांगण असून प्रशस्त वाहनतळदेखील आहे. प्रत्येक इमारतीसाठी लिफ्टची सोय असून सौरऊर्जा युनिटही आहे. पाण्याचे नियोजन, ओला व सुका कचरा व्यवस्थापन, क्लब हाउस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी व्यवस्थापन, अग्निशामक यंत्रणा अशा सुविधाही आहेत.
घरबसल्या बघा सोडत
प्राधिकरण सेक्टर १२ मध्ये उभारलेल्या गृहप्रकल्पातील सदनिकांची सोडत पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ऑनलाइन पद्धतीने काढली जाणार आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त सौरभ राव, उपाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राजेश
देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे उपस्थित राहणार आहेत. सदनिकांची सोडत चार सदस्यीय समितीच्या नियंत्रणाखाली होणार आहे. यामध्ये सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी आणि म्हाडाचे माहिती व संसूचन तंत्रज्ञान अधिकारी यांचा समावेश आहे.
निवड यादी संकेतस्थळावर
सदनिकांची सोडत काढताना अर्जदारांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता/ नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून दहा अर्जदारांना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. मात्र, सोडतीची लिंक अर्जदारांना मेसेजद्वारे पाठविण्यात येणार आहे. त्यावर घरबसल्या सोडतीचा कार्यक्रम पाहता येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थीची यादी व प्रतीक्षा यादी www. pendta.org.in या संकेतस्थळावर आणि http://lottery. pendta.org.in या पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
दृष्टिक्षेपात घरे
१,५६६ एलआयजी
३,३१७ इडब्ल्यूएस
४,८८३एकूण