व्हीएसआरएस न्युज आयुर्वेदिक पदवीधारक अर्थात बीएएमएस डॉक्टरांना रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी बंद पुकारला आहे.
तसेच आयुर्वेदिक डॉक्टरांना देण्यात आलेली ही परवानगी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही आयएमएने यावेळी केली आहे. सर्व वैद्यकशास्त्रांचे एकत्रीकरण करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी सरकारने नीती आयोगाच्या चार समित्यांची स्थापना केली असून त्यालाही आयएमएने तीव्र विरोध केला आहे.
आयुर्वेदिक डॉक्टरांना ठराविक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर रुग्णावर शस्त्रक्रिया करता येईल, असे सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने अलीकडेच काढलेल्या आदेशात म्हटले आहे. डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयाला तीव्र विरोध केला असून सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे मिक्सोपॅथी असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे.
वरील दोन निर्णयाविरोधात आयएमएने शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारला असून यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा देशव्यापी संप सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत पाळला जाणार असून गैर अत्यावश्यक तसेच गैर कोविड रुग्णसेवा शुक्रवारी बंद ठेवल्या जातील, असेही आयएमएकडून सांगण्यात आले आहे. अपघात विभाग (Accident Department), आपत्कालीन रूम्स (Emergency Rooms), क्रीटीकल केअर (Critical Care), अतिदक्षता विभाग , कोविड केअर), अत्यावश्यक सेवा , लेबर रूम या सेवा-सुविधा मात्र पूर्ववत चालू राहतील असेही आयएमएकडून सांगण्यात आले आहे.