व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी मुंबई -मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 9 डिसेंबर रोजी पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्याअनुषंगाने मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे.
चव्हाण म्हणाले, या समन्वय समितीमध्ये ऍड. आशिष गायकवाड, ऍड. राजेश टेकाळे, ऍड. रमेश दुबे पाटील, ऍड. अनिल गोळेगावकर व ऍड. अभिजीत पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या 9 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा.
ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे. यासाठी राज्य सरकारने 20 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारे चार अर्ज करण्यात आले होते.