व्हीएसआरएस न्युज पिंपरी- नगरसेवक उत्तम केंदळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील चाकण पोलीस स्टेशन अंकित असलेल्या म्हाळुंगे पोलीस चौकीला नुकतेच पोलीस स्टेशन म्हणून मान्यता देण्यात आली आहे. चाकण टप्पा क्रमांक दोन हा भाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने व्यापलेला आहे. या भागात मोठी औद्योगिक वसाहत तसेच अनेक कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार या भागात वास्तव्यास आहेत.
या भागाची व्याप्ती खूप मोठी आहे. सहा गावे मिळून चाकण टप्पा क्रमांक दोन उभारला आहे. यातच म्हाळुगे पोलीस चौकीची व्याप्ती खूप असल्याने या सर्व गावांच्या मध्यभागी वासुली फाटा या ठिकाणी बाजार पेठ भरते. तिथे पोलीस चौकी उभारणे गरजेचे आहे.
या भागात शेतकरी, ग्रामस्थ, नागरिक, विद्यार्थी वर्ग, महिला तसेच बाहेरून आलेला कामगार वर्ग यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. याचा फायदा घेत काही गुंड, लुटारू, चोर प्रवृत्तीचे लोक स्थानिकांना त्रास देतात. यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. यातूनच मोठे गुन्हे घडण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे पोलीस चौकी उभारली तर निश्चितच या बाबींवर आळा बसेल.
वासुली फाटा या ठिकाणी नव्याने पोलीस चौकी उभारण्यात आली तर शिंदे, वासुली, वराळे, भांबोली, सावरदरी, खालुंब्रे, शेलू, आसखेड, करंजविहिरे, शिवे आणि पश्चिम भागातील सर्व गावांना फायदा होईल. या गावांसाठी महत्वाचे ठिकाण आणि सध्याची सर्वात मोठी बाजारपेठ वासुली फाटा आहे.
वासुली फाटा येथे नवीन पोलीस चौकी निर्माण झाल्यास या भागातील शेतकरी, ग्रामस्थ यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांना पोलीस चौकी जवळ उपलब्ध होईल आणि पोलिसांना सुद्धा त्यांचे काम करण्यास सोयीस्कर होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वासुली फाटा येथे नवीन पोलीस चौकी तयार करावी, अशी मागणी स्व. तानाजी भाऊ केंदळे प्रतिष्ठाण व नगरसेवक उत्तम केंदळे यांच्याकडून करण्यात आली आहे. याबाबत केंदळे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले आहे.