व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत अधिवेशनाचा आटोपशीर कार्यक्रम ठरविण्यात आला.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10 मार्च चालणार असून प्रत्यक्ष कामकाज 8 दिवस चालणार आहे. राज्यपालांचे अभिभाषण, सत्ताधारी तसेच विरोधकांचा प्रस्ताव, पुरवणी मागण्यांसह कामकाज चालणार असून राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्च रोजी सादर होणार आहे.
विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या मागील आठवडय़ात झालेल्या बैठकीत 28 दिवसांच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमापैकी 8 दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता.
झालेल्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे कामकाज 1 ते 10 मार्चदरम्यान पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्री तसेच आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कमी दिवसांचा कार्यक्रम ठरविण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली.
या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक नाही!
कामकाज सल्लागार समितीने ठरविलेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उल्लेख नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात सल्लागार समितीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव आणण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे एक दिवस आधी नोटिफिकेशन काढून अध्यक्षपदाची निवडणूक घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे उपाध्यक्षांच्या उपस्थितीतही अधिवेशनाचे कामकाज पार पडता येते, असे अॅड. अनिल परब यांनी स्पष्ट केले.
1 मार्च ः राज्यपालांचं अभिभाषण, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शन प्रस्ताव, पुरवणी मागण्यांचे सादरीकरण
2 मार्च, 3 मार्च ः राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव
4 मार्च, 5 मार्च ः पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान, विरोधकांचा प्रस्ताव
6 मार्च, 7 मार्च ः शनिवार,
रविवारची सुट्टी
8 मार्च ः अर्थसंकल्प सादर होणार
9 मार्च ः शासकीय कामकाज, सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव
10 मार्च ः अर्थसंकल्पावर चर्चा, अधिवेशनाची सांगता