व्हीएसआरएस न्युज मुंबईः शिवसेनेचा झुंजार कामगार नेता अशी ओळख असलेले सूर्यकांत महाडिक यांचे अल्पशा आजाराने चेंबूरच्या झेन हॉस्पिटलमध्ये सोमवारी ११ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता निधन झाले.
अंत्यदर्शन (मंगळवारी) चेंबूरच्या निवासस्थानी (अमर निवास, महादेव पाटील वाडी, बोर्ला-घाटलागांव, चेंबूर) सकाळी ७ ते १० या वेळेत आहे. अंत्यसंस्कारासाठी पार्थिव रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या काडवली (पाचघर वाडी) येथे नेले जाईल.
सूर्यकांत महाडिक शिवसेनेच्या (ShivSena) भारतीय कामगार सेना (Bhartiya Kamgar Sena – BKS) या संघटनेचे अनेक वर्ष समर्थपणे नेतृत्व करत होते.
त्यांच्या निधनामुळे कामगार क्षेत्रातील एक जाणते नेतृत्व गमावल्याची भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली.
शिवसेनेचे झुंजार नेते कमांडर दत्ताजी साळवी भारतीय कामगार सेना (भाकासे) या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. दत्ताजी साळवी यांच्या पश्चात काही काळ रमाकांत मोरे यांनी भारतीय कामगार सेना (भाकासे) या संघटनेचे नेतृत्व केले. यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी कामगारांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सूर्यकांत महाडिक यांच्याकडे सोपवली. सूर्यकांत महाडिक सलग वीस वर्षे समर्थपणे भारतीय कामगार सेना (भाकासे) या संघटनेचे नेतृत्व करत होते. त्यांच्या कार्यकाळात संघटना मोठी आणि सामर्थ्यशाली झाली.
अनेक कंपन्यांमध्ये मतभेद दूर करुन वेतन करार घडवून आणले गेले. कामगारांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वात भारतीय कामगार सेना (भाकासे) या संघटनेने काम केले. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही भारतीय कामगार सेना (भाकासे) या संघटनेचे जाळे पसरवण्यात सूर्यकांत महाडिक यांचे लक्षणीय योगदान आहे. याच कारणामुळे सूर्यकांत महाडिक यांच्या निधनाने शिवसेनेने कामगार क्षेत्रातला आपला खंदा नेता गमावल्याची भावना अनेक कामगारांनी आणि शिवसैनिकांनी बोलून दाखवली.