व्हीएसआरएस न्युज पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसर्या सत्राच्या परीक्षा पुढच्या महिन्यात म्हणजेच 15 जूनपासून ….
याबाबतचा निर्णय शनिवारी (दि. 15) झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत दुसर्या सत्रातील परीक्षा घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर या परीक्षा 15 जूनपासून टप्प्याटप्प्याने घेण्यावर एकमत झाले. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्याची रूपरेषा परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे.
त्यातच कोरोना प्रादुर्भावामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठ बंद आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा कोरोनामुळे एप्रिल महिन्यापासून घेण्यात येत आहे. ही परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने योग्य पद्धतीने घेतली. यामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीविना परीक्षा देता आली. ही परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्यात विद्यापीठाला यश आले आहे.
दरम्यान, प्रथम सत्राची परीक्षा जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतर दुसर्या सत्रातील परीक्षाही लवकर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांतून होत होती. त्यादृष्टीने विद्यापीठाने दुसर्या सत्रातील परीक्षेचे नियोजन करण्याचे काम हाती घेतले आहे. परीक्षा 15 जूनपासून सुरू होणार असल्याने त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य होणार आहे. दरम्यान, दुसर्या सत्रातील सर्व अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकवून पूर्ण झाला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनात मिळालेले गुण महाविद्यालयाकडून प्राप्त झाल्याशिवाय निकाल जाहीर करता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी 15 जूनपर्यंत मप्रात्यक्षिकफची परीक्षा घ्यावी. त्याचे गुण 25 जूनपर्यंत विद्यापीठाकडे सादर करावेत, असाही निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.