व्हीएसआरएस न्युज अवघे आयुष्य माऊलींच्या सेवेत अर्पण करणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे जनक गुरुवर्य हैबत बाबांच्या पायरी पूजनाने ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यास आज (मंगळवार) पासून प्रारंभ झाला. पंढरपूरमधील संत नामदेव पायरी प्रमाणेच आळंदीत माऊली चरणी हैबत बाबा यांची पायरी असून त्यांच्या परंपरागत पायरी पूजनाने सोहळ्याला प्रारंभ होत असतो.
पहाटे पवमान अभिषेक व दुधआरती पूजा कार्यक्रम उरकल्या नंतर सकाळी नऊ वाजता मुख्य महाद्वारा समोर असलेल्या हैबतबाबांच्या पायरीचे पूजन विधीवत मंत्रोपचार करत हैबत बाबांचे वंशज पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर -पवार, राजेंद्र आरपळकर, संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, विश्वस्त ॲड.विकास ढगे पाटील, योगेश देसाई यांचे हस्ते पायरीचे पूजन करण्यात आले.
मंत्रोपचार व धार्मिक विधी श्रीनिवास कुलकर्णी, अमोल गांधी ब्रम्हवृंदानी केले. यावेळी माऊलींचे चोपदार राजाभाऊ चोपदार, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, माजी नगरसेवक संतोष गावडे, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, मानकरी दिनेश कुऱ्हाडे, बाळासाहेब कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, माऊली गुळुंजकर, माऊलीं दिघे व आळंदीकर ग्रामस्थ, भाविक वारकरी उपस्थित होते.
आळंदीत संचार बंदी असल्याने यंदा प्रथमच सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान आळंदीत शांतता दिसून येत होती. सर्व रस्ते सुनेसुने दिसून येत आहेत. मंदिर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.