व्हीएसआरएस न्युज पिंपरी- वार्ताहार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे.
त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती 18 फेब्रुवारीच्या महासभेत केली जाणार आहे. त्यात भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेना आणि अपक्ष आघाडीच्या एका सदस्यांचा समावेश आहे. या पंचवार्षिकमधील हे शेवटचे वर्ष असल्याने स्थायी समिती सदस्यपदी वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
महापालिकेतील स्थायी समिती ही अत्यंत महत्वाची समिती आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व आर्थिक बाबींचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे या समितीवर वर्चस्व असणा-यांचा महापालिका कारभारात बोलबाला असतो. पालिकेचा कारभार ही समिती हाकत असते. स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1आणि अपक्षांचा 1 नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.