व्हीएसआरएस न्युज पुणे – ब्रिटन आणि अन्य काही देशांमध्ये करोनाच्या विषाणूचा जो नवा प्रकार आढळला आहे, त्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
पुण्यातील विधानभवनात पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात बैठक झाली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, आमदार अण्णा बनसोडे, ससून रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी एस.चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीएचे) आयुक्त सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी उपस्थित होते.
नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, मास्क वापरावा आणि इतर आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले. तसेच, प्रशासकीय पातळीवरून नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्याला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरही अधिकची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक यंत्रणेने नियोजन करणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता कायम ठेवावी, गरजू रुग्णाला आरोग्यसुविधा वेळेत मिळाव्यात, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही पवार यांनी संबंधित यंत्रणेला दिले. करोना प्रतिबंधक लसीच्या पूर्व तयारीचा आढावाही पवार यांनी घेतला.
ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून घेण्यात येत असलेली खबरदारी, रुग्णालय व्यवस्थापन, रुग्णांचे बील व्यवस्थापन, कोविडनंतरचे समुपदेशन, आठवडानिहाय नमुना तपासणी प्रयोगशाळा तपशील, पॉझिटिव्हीटी दर आणि कमी झालेला मृत्यूदर, पुणे महापालिका क्षेत्रातील करोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजना या सर्वांची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी पवार यांना दिली.