व्हीएसआरएस न्युज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारळांची आरास व धार्मिक विधी यानिमित्ताने मंदिरामध्ये पार पडले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
मनाचे प्रतीक आहे फुल. तर बुद्धीचे प्रतीक आहे नारळ. नारळाला जशा बुच्या असतात, त्यात करवंटी असते, त्यावर तीन डोळे असतात, तशीच रचना आपल्या डोक्याची आहे. त्या डोक्याचे, त्यात असणा-या बुद्धीचे प्रतीक आहे नारळ. भगवंताला मन आणि बुद्धी समर्पित करण्याचे प्रतीक फुल आणि नारळ. बुद्धीवरील मळ झटकून त्या शुद्ध बुद्धीला श्री गजानन चरणी नतमस्तक करण्याचा हा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.
अंत:करणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच्छ, प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज. या श्री उमांगमलजांचा जन्मोत्सव कार्तिक शुद्ध चतुर्थीला होतो. गाणपत्य संप्रदायात या दिवशी मोरयाला नारिकेला अर्थात नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत धार्मिक कार्यक्रमांसह नारळांची आरास करण्यात आली.