Pune News : पुणे : श्रीरामांविषयी अनुचित उद्गार काढून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलीसठाण्यात राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम २९५ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात धीरज घाटे यांनी पोलिसात दिल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, मी दि. ०३ जानेवारी रोजी आमच्या पक्षाचे कार्यकर्ता यांच्या निंबाळकर तालिम चौकातील कार्यालयात एबीपी माझा चॅनेलवर शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय शिबीराचे थेट प्रक्षेपण पाहिले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड हे व्यासपीठावरून ‘प्रभू श्रीरामचंद्र १४ वर्षे वनवास भोगत असताना मांसाहार करत होते. प्रभू रामचंद्र बहुजनांचा राम, शिकार करून खाणारा राम, राम हा शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता’ असे समाजात तणाव निर्माण करणारी प्रक्षोभक वक्तव्ये करताना पाहिले.
येत्या २२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमिवर देशातील धार्मिक सलोखा, अखंडता बाधित करण्यासाठी आव्हाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे माझी त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार आहे.
Discussion about this post