व्हीएसआरएस न्युज पिंपरी- आज जागतिक पर्यावरण दिन या दिनानिमित्त पर्यावरण विषयक अनेक उपक्रम राबविले जातात या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्ती च्या आठवणी जोपासण्यासाठी एक झाड लावावे या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी “एक झाड आठवणींचं” हा सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे की
सगेसोयरे, मित्रपरिवार, कामातील सहकारी असं कोणी न कोणीतरी आपल्याला सोडून कायमचं निघून गेलं आहे, आपल्यापासून खूप दूर… कधीही फिरून माघारी न येण्यासाठी!
ही माणसं आयुष्यात होती म्हणून आपल्या आयुष्याला अर्थ होता. जीवनचक्रानुसार मृत्यू अटळ आहे. वयाचं, आजाराचं निमित्त होतं आणि माणूस निघून जातो; पण आठवणींच्या रूपानं तो उरतोच प्रत्येकात!
गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी चिरंतन राहण्यासाठी स्मारकं बांधली जातात; पण आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ “एक झाड आठवणींचं” लावलं तर निसर्गाचा समतोलही राखला जाईल आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी देखील चिरंतन टवटवीत, जिवंत राहतील… सळसळत्या हिरव्यागार झाडासारख्या..!