व्हीएसआरएस न्युज गुजरात विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे. या निवडणुकीला अवघे एकच वर्ष बाकी राहिले असताना भाजपने गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलला आहे.
भाजपने दीर्घकाळ पाटीदार नेता राहिलेल्या भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. यावरुन काँग्रेसने भाजप आणि पर्यायाने पंतप्रधान पदावर असलेल्या नरेंद्र मोदी यांचे अपयश आधोरेखीत करत ट्विटरवर मोहीम सुरु केली आहे.
मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांची निवड केली. या निवडीवरुन काँग्रेसने (Congress) भाजप आणि भाजप नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपच्या मुख्यमंत्री बदलाबाबत काँग्रेसने ट्विटरवर ‘#CM_नहीं_PM_बदलो’ ही मोहीम सुरु केली आहे. तसेच, आता पंतप्रधानच बदलायला हवा मुख्यमंत्री बदलून पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नसल्याचेही, काँग्रसने म्हटले आहे.
काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण वेगाने करुन कोरोनावर मात करायला हवी होती. परंतू, ही साधी बाब पंतप्रधान आणि सत्तेतील भाजप सरकारला कळली नाही. देशातील कोरोना स्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी पंतप्रधान कधी घेणार आहेत. लसीकरण झालेल्या देशांच्या तुलनेत भारत प्रचंड मागे आहे. आकडेवारीच हे सांगत असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.
भूपेंद्र पटेल पाटीदार समाजातून येतात. विजय रुपाणी सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. यासह, भूपेंद्र पटेल दीर्घ काळापासून संघाशी संबंधित आहेत. पटेल समाजातही त्यांची चांगली पकड आहे. त्याचबरोबर 2017 च्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या मतांनी विजय मिळवला होता. भूपेंद्र पटेल विधानसभा निवडणूक 1 लाख 17 हजार मतांनी जिंकले होते. भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभेचे आमदार आहेत. यापूर्वी भूपेंद्र पटेल अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे (AUDA) अध्यक्ष होते. भुपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
Discussion about this post