नंदुरबार । व्हीएसआरएस न्यूज ।
येथील सुझलॉन कंपनीच्या टॉवरमधील केबल चोरीच्या पूर्वतयारीत असणाऱ्या टोळीतील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर टोळीतील एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. तालुका पोलिसांनी अटक केलेल्या चारही जणांकडून चोरी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुझलॉन कंपनीतर्फे पवन चक्की बसवण्यात आल्या आहेत. या सुझलॉन कंपनीच्या टॉवरमधून केबल वायरच्या चोरीच्या घटना वारंवार घडल्या होत्या. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द या गावातील टोळीकडून चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. सुझलॉन कंपनीच्या टॉवरच्या सुरक्षिततेसाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांना धाक दाखवून ही टोळी त्यामधील केबल वायरची चोरी करणार आसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नंदुरबार जिल्हा पोलीस अधक्षिक पी. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी पथके तयार करून काळमदेव मंदिराच्या पायथ्याशी सापळा रचला. गुप्त बातमीनुसार एका दुचाकीवर चार जण आणि एका दुचाकीवर एक जण असे पाच जण काळमदेव मंदिराच्या पायथ्याजवळ आले असता, त्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. संदीप गोरख सूर्यवंशी, मनोहर पोपट पदमोर, अधिकार रतन थोरात, राजेंद्र हिरामण खताळ अशी त्यांची नावे असून, ते सर्व जण साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द येथील रहिवासी आहेत. संशयित आरोपी रोहिदास शिवाजी मासुळे हा फरार झाला आहे.
Discussion about this post