व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गुरूवारी (14 एप्रिल) मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पुणे स्टेशन, अरोरा टॉवर, विश्रांतवाडी, दांडेकर पूल, दत्तवाडी भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर सकाळी सहा वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. शाहिर अमर शेख चौकातून मालधक्का चौक, जीपीओ ते बोल्हाई चौक, पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौक, नरपतगिरी चौक ते मालधक्का चौक, बॅनर्जी चौक ते शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर, लष्कर भागातील अरोरा टॉवर चौक परिसरातील कोयाजी रस्त्यावरून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौक येथे बंद करून “एसबीआय’ हाऊस चौकाकडे वळवण्यात येणार आहे. ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नेहरु चौकाकडून तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक नेहरु चौकातून डावीकडे किराड चौकाकडे वळवण्यात येणार आहे.
दांडेकर पूल परिसरात वाहतुकीत बदल
दांडेकर पूल परिसरात 13 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते गर्दीसंपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक वळवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून सिंहगड रस्त्याकडे येणारी आणि सिंहगड रस्त्यावरील आशा चौकातून सावरकर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान, सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सावरकर चौक, सारसबाग चौक, सणस पुतळा, कल्पना हॉटेल चौक, ना. सी. फडके चौक, मांगीरबाबा चौक, सेनादत्त पोलीस चौकी, बालशिवाजी चौक, आशा हॉटेल चौकामार्गे उजवीकडे वळून सिंहगड रस्त्याकडे जावे. तर सिंहगड रस्ताने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आशा हॉटेल चौक, बालशिवाजी चौक, सेनादत्त पोलीस चौकी, मांगीरबाबा चौक, ना.सी. फडके चौक, कल्पना हॉटेल चौकाकडून जावे.
विश्रांतवाडी परिसरात होणार हे बदल
विश्रांतवाडी परिसरात दुपारी तीन वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत वाहतूक वळवण्यात येणार आहे. शहरातून विमानतळ, टिंगरेनगरकडे जाणाऱ्या वाहनांना मेंटल कॉर्नर चौकातून उजवीकडे वळून कॉमर्स झोन चौकातून डावीकडे वळून टिंगरेनगर-विमानतळ रस्त्याकडे जातील किंवा येरवडा जेलसमोरून पुढे पोस्ट ऑफीस चौकातून डावीकडे वळून जातील. बोपखेल, दिघी, भोसरी, आळंदीकडे जाणारी वाहने शांतीनगर चौकातून डावीकडून चव्हाणचाळ, मासे मार्केटमार्गे कळस फाटा येथे जातील. कळस, म्हस्के वस्ती, बोपखेल, दिघी, आळंदीकडून पुण्याकडे जाणारी वाहने कळस फाटा येथून टॅंक रोडने चव्हाण चाळ, शांतीनगरमार्गे खडकीकडे किंवा शांतीनगर चौकाकडे जातील. धानोरीकडून शहरात येणारी वाहने आनंद मंगल कार्यालयाशेजारील रस्ता किंवा भर ढाब्याशेजारील रस्त्याने विमानतळ रस्त्याने 509 चौकातून येतील. तर विमानतळाकडून खडकी, भोसरीकडे जाणारी वाहने सिद्धेश्वर चौकातून नवीन कॉमर्स झोन रस्त्याने कॉमर्स झोन चौकातून मेंटल कॉर्नर चौकाकडून आळंदी रस्त्याने खडकी, भोसरीकडे जातील.
Discussion about this post