व्हीएसआरएस मराठी न्युज –
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)फोन टॅपिंग प्रकरणी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे.
मागील काही दिवसांपासून संजय पांडे हे न्यायालयीन कोठडीत होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी त्यांना ईडीने अटक केली होती. परंतु आज त्यांना दिल्ली न्यायालयात हजर केले असता दिल्ली न्यायालयाने संजय पांडेंना ४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
एनएसईचे माजी सीईओ रवी नारायण हे देखील ईडीच्या ताब्यात आहेत. एनएसई घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरण आणि एक्सचेंज कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. ईडीने १४ जुलै रोजी नारायण, माजी एनएसई प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात पीएमएल अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या तिघांविरुद्ध सर्वात प्रथम गुन्हा दाखल केला होता.
संजय पांडे यांनी आयआयटी कानपूरमधून कंप्यूटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर ते १९८६ बॅचचे आयपीएस ऑफिसर असून ३० जून २०२२ रोजी ते सेवानिवृत्त झाले. संजय पांडे पोलीस सेवेत दाखल होण्याआधी त्यांची आय सिक्युरिटी ही एक आयटी कंपनी होती. या आयटी कंपनीकडून विविध कंपन्यांचं ऑडिट केलं जायचं. याच कंपनीवर २०१० ते २०१५ या कालावधीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे सिक्युरिटी ऑडिट करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
यादरम्यान नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये को लोकेशन घोटाळा झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणी तपास यंत्रणांनी अलीकडेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या तत्कालीन सीएमडी चित्रा रामकृष्णन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. दरम्यान सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीने देखील मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे सिक्युरिटी ऑडिट करण्यासाठी संजय पांडे यांच्या कंपनीला कोट्यवधी रुपये देण्यात आले होते. मात्र ऑडिटच्या आडून त्यांच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप केला जात आहे. ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना निवृत्तीनंतर लगेच ३० जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते.
Discussion about this post