व्हीएसआरएस मराठी न्युज भोसरी-नेहरुनगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात छोट्या प्राण्यांच्या दहनासाठी दुसरी गॅसदाहिनी बसविण्यात येणार आहे. सध्या येथे असलेली गॅसदाहिनी जुनी आहे.
तिच्यात तांत्रिक बिघाड होत असतात. त्यामुळे ही गॅसदाहिनी बंद पडल्यानंतर त्यावर पर्याय उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पालिकेच्या वतीने 63 लाख 52 हजार रुपये खर्च करून नवीन गॅसदाहिनी बसविण्यात येणार आहे.
शहरात सध्या 10 ते 15 हजार पाळीव श्वान आहेत. तर, अंदाजे 70 ते 75 हजार भटकी कुत्री आहेत. वृद्ध झाल्याने दररोज मृत होणार्या श्वानांचे प्रमाण 8 ते 9 इतके आहे. शहरातील मृत श्वानांचे यापूर्वी नेहरुनगरला दफन करण्यात येत होते; मात्र तेथे एक गॅसदाहिनी उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्या दहनाची सोय झाली. मात्र, ही गॅसदाहिनी तांत्रिक कारणाने बंद पडल्यानंतर नागरिकांना श्वानांचे दहन करण्यासाठी पुणे गाठावे लागते. ही गैरसोय दूर व्हावी. तसेच, एका गॅसदाहिनीला दुसरा पर्याय उपलब्ध राहावा, या उद्देशाने महापालिकेकडून दुसरी गॅसदाहिनी बसविण्यात येणार आहे.
नेहरुनगर येथील दवाखान्यात सध्या असलेली गॅसदाहिनी जुनी झालेली आहे. तिच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर नागरिकांना श्वान व अन्य छोट्या प्राण्यांच्या दहनासाठी पुण्यात जावे लागते. मात्र, दुसरी पर्यायी गॅसदाहिनी ठेवल्यास त्यांची गैरसोय दूर होणार आहे. त्यासाठी महापालिका विद्युत विभागामार्फत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
– सचिन ढोले, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग, महापालिका
Discussion about this post