व्हीएसआरएस मराठी न्युज –
राज्यातील प्रतिभासंपन्न खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहून राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी-म्हाळुंगे येथे २ ते १२ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे औपचारिक उदघाटन ५ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
विधानभवन सभागृह पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, उपसंचालक संजय सबनीस आदी उपस्थित होते.
राव म्हणाले, स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आणि खेळाडूंमधील क्रीडा कौशल्य वाढीस लागण्यास मदत होईल. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे आयोजन राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये करण्यात येत असून या स्पर्धेमध्ये ३९ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राज्यातील १० हजार ४५६ खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक , व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
स्पर्धेकरीता १८ वर्षांवरील वयोगटातील खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रत्येक क्रीडा प्रकाराच्या एकविध क्रीडा संघटनेमार्फत त्या-त्या क्रीडा प्रकारातील राज्यातील सर्वोत्कृष्ट आठ संघांची व खेळाडूंची निवड करण्यात आलेली असून हे निवडक आठ जिल्ह्यांचे संघ महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
Discussion about this post