पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | पुण्याच्या कोरेगाव आश्रमातील ओशोंचा आश्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ओशोंच्या आश्रमात सन्यासी माळा घालून प्रवेश नाकारल्यानं ओशोंच्या अनुयायांनी गेट तोडून आत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणाला मारहाण केली असून, ओशोंच्या अनुयायांना ताब्यात घेण्यात आलंय. ओशो आश्रम व्यवस्थापन विरुद्ध ओशोंचे अनुयायी असा हा वाद आहे. बुधवारी गळ्यात सन्यासी माळ असूनही प्रवेश नाकारल्यानं संतापलेल्या ओशोच्या अनुयायांनी पुण्याच्या कोरेगावच्या ओशो आश्रमात हा असा गोंधळ घातला. यावेळी ओशोच्या काही अनुयायांनी पोलिसांनाही जुमानले नाही. त्यानंतर पोलिसांनी या अनुयायांना चांगलाच प्रसाद दिला. तसचं काही अनुयायांना ताब्यातही घेण्यात आलं. आचार्य रजनीश ओशो यांच्या मंगळवारी झालेल्या ७० व्या संबोधी दिनानिमित्त जगभरातून त्यांचे अनुयायी पुण्यात आलेत. मंगळवारी त्यांना गळ्यात सन्यासी माळ घालून प्रवेश देण्यात आला होता. बुधवारी मात्र माळा घालून प्रवेश करण्यास व्यवस्थापनानं नकार दिला. यामुळं अनुयायी संतापले. ओशो जयंती, ओशो महापरिनिर्वाण, गुरुपोर्णिमा आणि ओशो संबोधी दिन हे उत्सव साजरे करु नयेत यासाठी व्यवस्थापन प्रयत्न करीत असल्याचा अनुयायांचा आरोप आहे.
पोलीस कर्मचारी परदेशी, सहकारी उपनिरीक्षक संभाजी नाईक, गणेश कस्पटे, नदाफ बंदोबस्तावर होते. त्या वेळी रावलने ‘ओशो, ओशो’ अशी घोषणाबाजी करुन ट्रस्टचे व्यवस्थापक धनेशकुमार जोशी यांच्याशी वाद घातला. पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले. तेव्हा रावलने पोलिसांशी वाद घालून धक्काबुक्की केली, असे पोलीस नाईक परदेशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक लिगाडे तपास करत आहेत.
Discussion about this post