पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकाकडील थकीत दंड वसूल करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली. त्यानुसार जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात दोन कोटी ४४ लाखांचा दंड वसूल केला. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकूण १४ वाहतूक विभाग असून या अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. दरम्यान, अशा बेशिस्त चालकांवर वाहतूक शाखेमार्फत इ चलन प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. या दंडाची रक्कम अनेक चालकांनी जमा केली नसल्याचे इ चलन प्रणालीद्वारे समोर आले.
दरम्यान, या थकीत दंडाची वसुली करण्यासाठी पोलिसांकडून विशेष नाकाबंदी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान जानेवारी महिन्यात एक कोटी दोन लाख २९ हजार ८५० रुपये तर फेब्रुवारी महिन्यात एक कोटी ४२ लाख ५८ हजार ७५० असा एकूण दोन कोटी ४४ लाख ८८ हजार सहाशे रुपये दंड वसूल करण्यात आला.
अशाच प्रकारे यापुढेही वेगवेगळ्या ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करून दंड वसूल केला जाणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या वाहनांवर असलेल्या थकीत दंडाची रक्कम महाट्राफिक ॲपद्वारे अथवा जवळच्या वाहतूक विभागात जाऊन जमा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दंडाची रक्कम न भरणाऱ्या वाहन चालकांवर न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे, असा इशारा ही पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.
Discussion about this post