पिंपरी-चिंचवड | (व्हीएसआरएस न्यूज) | पुण्यातील पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यापासून चर्चेत होती. महाराष्ट्रात उद्भवलेल्या सत्तासंघर्षाचे परिणाम पुणे पोटनिवडणुकीवरही पाहायला मिळाले. अखेर चिंचवड मतदारसंघात भाजपचीच सरशी झाली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचं आव्हान होतं. महाविकास आघाडीला या निवडणुकीत कलाटेंच्या बंडखोरीचा फटका बसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
कोणाला किती मते?
चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली होती. तिरंगी लढतीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली.
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा खूप प्रयत्न झाला. पण अखेर महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध न करता आपला उमेदवार घोषित केला. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. पण उमेदवारीसाठी आग्रही असलेले राहुल कलाटे यांची नाराजी महाविकास आघाडीने ओढवून घेतली. अखेर भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या होत्या.
गड राखण्यात भाजप यशस्वी
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 50.47 टक्के मतदान झालं होतं. म्हणजेच, 5 लाख 68 हजार 954 मतदारांपैकी 2 लाख 87 हजार 145 मतदारांनी मतदान केलं होतं. चिंचवडमध्ये मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप यांच्यासह सगळीकडे सध्या ज्या उमेदवाराची चर्चा सुरु होती आणि ज्या उमेदवाराने राष्ट्रवादी आणि भाजपचं टेन्शन वाढवलं होतं, अशा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिहेरी लढत पार पडली. तिघांकडूनही जोरदार प्रचार करण्यात आला होता. तिघांकडूनही प्रचारासाठी मोठमोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती. रॅली, सभा, पदयात्रा काढण्यात आल्या. पण आपला मतदार संघ ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आलं आहे.
कोण आहेत अश्विनी जगताप?
अश्विनी जगताप या चिंचवड मतदारसंघाचे भाजपचे दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या मतदारसंघात भाजपकडून अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण फारसा फायदा झाला नाही. अखेर अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका, दिग्गजांच्या प्रचाराचाही फारसा फायदा नाहीच
राष्ट्रवादीकडून नाना काटेंना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. यावरुन नाराज होत राहुल कलाटेंनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याचाच फटका चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला झाल्याचं दिसत आहे. कलाटेंच्या बंडखोरीमुळे मत विभागली गेली आणि त्याचा फायदा आपसूकच भाजपला झाल्याचं निवडणूक निकालांवरुन स्पष्ट दिसतं आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही नाना काटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार मैदानात उतरले होते. तसेच, उमेदवार नाना काटे हेही घरोघरी जाऊन प्रचार करत होते. 2017 साली पालिकेच्या सत्ता हाती घेताना भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आता जनता आमच्या बाजूने आहे, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला होता. त्यासोबतच चिंचवड विधानसभा पुन्हा काबीज करण्यासाठी विरोधीपक्ष नेते अजित पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार सभा अथवा रॅली न काढता, त्यांनी घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला होता. निवडणुकीवेळी तब्बल आठवडाभर अजित पवार चिंचवड विधानसभेत ठाण मांडून होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी जंगजंग पछाडत असल्याचं पाहायला मिळलं होतं. भाजपकडूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी टीम मतदारसंघात तैनात केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दौराही झाला होता.
Discussion about this post