Breaking News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडीफाटा परिसरात दि. २ डिसेंबर रोजी बेदम मारहाण झालेल्या व्यक्तीचा दि. ६ डिसेंबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. केवळ मृताचा फोटो आणि अपूर्ण नाव एव्हढीच माहिती उपलब्ध असताना वाकड पोलिसांच्या तपास पथकाने मोठ्या चिकाटीने तपास करून मृताला बेदम मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीस जेरबंद केले आहे.
योगेश जगन्नाथ सुर्वे, वय ४० वर्षे, रा. नखातेनगर, रहाटणी, पुणे असे मृताचे नाव असून अनिकेत ऊर्फ सनी रमेश काळे, वय २६ वर्षे, रा. अशोकनगर झोपडपट्टी, मॉडेल हायस्कुलशेजारी, वाशी नाका, चेंबुर, मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार योगेश सुर्वे याला दि. २ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने मारहाण केली होती. त्यामुळे त्याला औंध रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान दि. ६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला होता. शवविच्छेदनामध्ये जबर मारहाण झाल्याने पोटातील आतडी फाटून मृत्यू झाल्या निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली होती. परंतु मृताचे अपूर्ण नाव आणि फोटो एव्हढेच हाती असल्यामुळे तपासाचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी काळेवाडीफाटा येथे जाऊन नागरिकांना मृताचा फोटो दाखवून चौकशी करण्यास सुरुवात केली. परंतु माहिती मिळत नव्हती. शेवटी एका भटक्या व्यक्तीने मृत व्यक्ती ड्रायव्हर असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तो ज्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करीत असे तेथे जाऊन चौकशी केली. तेव्हा तो मिळेल त्या ठिकाणी रहात असे आणि ड्रायव्हर म्हणून काम करत असे अशी माहिती मिळाली. तपासपथक गजानननगर येथे चौकशी करत असताना एका लहान मुलाने फोटोमधील व्यक्ती ड्रायव्हर असून त्याला काही दिवसांपूर्वी सनीने मारहाण केली होती अशी माहिती दिली. परंतु त्या लहान मुलाला सनी कोठे राहतो याची काही माहिती नव्हती. त्याला केवळ त्याच्या भाच्याचे नाव माहिती होते. यामुळे तपासात अडचण निर्माण झाली.शेवटी पोलिसांनी परिसरातील लहान मुलांना बोलावून सनीच्या बहिणीचा पत्ता शोधून काढला. पोलीस त्या पत्त्यावर पोहोचले असता सनीच्या बहिणीने तो मुंबई येथे रहात असून तो ३ डिसेंबर रोजी मुंबईला परत गेल्याचे सांगितले.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईतून सनी याला अटक केली. त्यानंतर त्याने मृत योगेश आणि तो एकत्र असताना त्याला योगेश याने शिवीगाळ केल्यामुळे त्याला बेदम मारहाण केल्याची आणि तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाल्याची जाणीव झाल्यामुळे मुंबईस पळून आल्याची कबुली दिली.पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ डिसेंबर पर्यंत पोलीसकोठडी दिली आहे.
Discussion about this post