चाकण | (व्हीएसआरएस न्यूज) | चाकण परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. रविवारी (दि. 26) बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडल्याची घटना कातकरीवस्ती (पठारवाडी) भागात घडली. ठिकठिकाणी बिबट्या दिसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. चाकणच्या कातकरीवस्ती लगतच्या भागात बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळले आहेत. गेल्या दोन दिवसांत एक कुत्रे आणि एक शेळी अशा दोन पाळीव जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला.
चाकण शहर आणि लगतच्या एकतानगर, पठारवाडी भागात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन दिवसांपूर्वी चाकणच्या एकतानगर भागात बिबट्या दिसला होता. वन विभागाने तपासणी केली असता बिबट्याचे पगमार्क आढळून आले. तातडीने त्या ठिकाणी दोन पिंजरे लावण्यात आले. मात्र, पिंजरा लावलेल्या भागाकडे बिबट्या फिरकलाच नाही. लगतच्या कातकरीवस्तीवर बिबट्या पाहिल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. याच कातकरी बांधवांच्या शेळीचा फडशा बिबट्याने पाडल्यानंतर संपूर्ण चाकणलगतच्या भागात बिबट्याचा संचार असल्याची बाब समोर आली आहे.
चाकण वन विभागाच्या अधिका-यांनी रविवारी सकाळी पठारवाडीजवळील कातकरी वस्तीवर जाऊन बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुरांचा पंचनामा केला. वन विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. चाकण शहराच्या परिसरात मुक्त संचार करणार्या बिबट्यास पकडण्यात वन विभागाला लवकरच यश येईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन चाकण वन विभागाकडून करण्यात आल्याचे रेस्क्यू टीमचे सदस्य प्रा. अतुल सवाखंडे यांनी सांगितले. दरम्यान चाकणच्या कातकरीवस्तीवर तातडीने वीज व दिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी चाकण विकास मंचचे कुमार गोरे, अॅड. निलेश कड, राम गोरे आदींनी केली आहे.
Discussion about this post