राजगुरूनगर | (व्हीएसआरएस न्यूज) | पुणे – नाशिक महामार्गाच्या खेड घाट बाह्यवळणावर दुचाकीस्वार चुलत बंधूंना अडवून 6 जणांनी जबर मारहाण करत त्यांच्याकडील ऐवज लुटला. तसेच युवकांच्या नातेवाइकांना फोन करायला लावून ’फोन पे’ व ’गुगल पे’द्वारे अनुक्रमे 10 हजार व 98 हजार रुपये त्यांच्या खात्यावर भरायला लावले. हा खळबळजनक प्रकार शनिवारी (दि. 25) रात्री साडेनऊ वाजता वेहेळदरा हद्दीत घडला. या प्रकरणी किरण सुनील गुंजाळ (वय 22, रा. आकुर्डी, पिंपरी – चिंचवड, मूळ रा. बेल्हे, ता. जुन्नर) यांनी सहा जणांविरुध्द खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार किरण व त्यांचे चुलत भाऊ नवनाथ विकास गुंजाळ हे पुण्याकडून दुचाकीने गावाकडे चालले होते. रस्त्याने जाताना कट मारल्याचा बहाणा करून दोन दुचाकीवरून आलेल्या सहा युवकांनी त्यांना घाटात दुचाकी आडव्या लावून अडवले. कोयत्याच्या उलट्या बाजूने दोघांच्या हातापायावर मारहाण करून व बंदूक सदृश्य हत्याराने फायरिंग केली. वाहनांची वर्दळ असल्याने त्यांनी दोघांना आड बाजूला खोलगट जागी नेले. तेथे या युवकांकडील घड्याळ, मोबाईल व एटीएम कार्ड काढून घेतले. त्यांच्याकडे रोख स्वरूपात केवळ 700 रुपये होते. ते काढून घेतल्यानंतर त्यांच्या मामांना संपर्क साधायला लावला. गुगल पे व फोन पेद्वारे 98 व 10 हजार रुपये काढून घेतले. नंतर जवळचे मोबाईल हिसकावून घेत या तरुणांनी पोबारा केला, असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची चौकशी पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.
तीन ठिकाणी दरोडा
खेड तालुक्यातील वाकी (भाम), खेड घाट तसेच संगमनेर (जि. अहमदनगर) घाटात वेळ बदलून असा दरोडा घालण्यात आला आहे. हे एकाच टोळीचे कृत्य आहे. शिवाय प्रवाशांकडे पैसे नसताना थेट फोन पे, गुगल पेवर रक्कम घेण्याचा गंभीर प्रकार आहे. दरोडेखोर तत्काळ जाळ्यात येतील, अशी खात्री आहे. पोलिस यंत्रणा कार्यरत आहे. नागरिकांनी रात्री एकट्याने वाहनाचा प्रवास टाळावा. मागे पुढे चालणार्या गाड्यांचा सहवास ठेवावा, असे आवाहन खेडचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी केले आहे.
Discussion about this post