Pimpri News : पिंपरी : भोसरी येथे असलेल्या महा ई सेवा केंद्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्डमध्ये फेरबदल करणाऱ्या चौघांना दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे.या चौघांमध्ये एक महिला असून ती वकील आहे. आधार कार्ड काढण्याचा किंवा त्यात दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना नसतानाही नवीन आधारकार्ड काढणे, त्यात दुरुस्ती करणे अशी कामे महा ई केंद्रातून हे टोळके करत होते. त्यासाठी राजस्थानमधील बायोमिट्रीक आधार पोर्टल यंत्राचा वापर ते करत होते. अशा प्राकारे मागील सुमारे ३ वर्षात अंदाजे ६०० ते ७०० जणांना त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्डे काढून दिली असावीत असा अंदाज असल्याची माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारे परदेशी घुसखोरांनाही या टोळक्याने आधारकार्डे काढून दिली असावीत अशी शंकाही चौबे यांनी व्यक्त केली असून त्याबाबत पोलीस तपास करत असल्याचे ते म्हणाले.
शिवराज चांभारे (कांबळे),धोंडिबा शेवाळकर, गणेश यंगड आणि एक वकील महिला यांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भोसरी पोलीसठाण्यात १८३/२०२३ क्रमांकाने भा.दं.वि.कलम ४२०, ४६५, ४६८, ४५१, ४७३, २४ व आधार कायदा २०१६ चे कलम ३६५५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शिवराज चांभारे याचे कृष्णा झेरॉक्स या नावाचे दुकान आहे. पोलिसांनी शहानिशा केली असता. या दुकानचालकाकडे कोणताही परवाना नसल्याचे त्यांना दिसून आले. पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता आधारकार्डाच्या काही पावत्यांवर एनरोलमेंट एजन्सी कोड ०५१६ व स्टेशन आयडी कोड १५३३४ असल्याचे आढळून आले. सदरचे कोड है गर्व्हमेंट ऑफ राजस्थान व एनरोलमेंट एजन्सी राज कॉम्प इन्फो सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडील असल्याचे आढळले.तसेच इतर आधार पावत्या चेक केल्या असता एनरोलमेंट एजन्सी कोड ०८६३ व स्टेशन आयडी कोड ५२०१४ असल्याचे आढळून आले. सदरचे एजन्सी कोड हे स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट राजस्थान यांचे असल्याचे आढळून आले. त्याशिवाय इतर काही आधार पावत्या चेक केल्या सता त्या जन्सी कोड ०६९१ व स्टेशन कोड ९००१० असल्याचे आढळून आले. सदरचे एनरोलमेंट एजन्सी कोड हे इक्वीटास स्मॉल फायनान्स बैंक राजस्थान यांचे नावे असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. साधारणतः एक ते दीड वर्षापूर्वी आरोपी शिवराज चांभारे याचा महाराष्ट्रातील आधारसंच जप्त करण्यात आला होता व त्याने जिल्हाधिकारी कार्यालय येथे विनंती अर्ज करुन आणि माफीनामा देवून संच परत प्राप्त करुन घेतला होता. कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी या दुकानाची पोलिसांनी सखोल तपासणी केली असता तेथे बनावट लाईटबीलच्या प्रती, काही इसमांचे ओरिजनल आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, तसेच विविध राज्यांचे जन्मदाखल्यांच्या प्रती, वेगवेगळे अनधिकृत रबरी शिक्के (त्यामध्ये पिंपरी चिंचवड म.न.पा. कडील नगरसेवक, नोटरी, सिक्युरिटी एजन्सी व फिंगर प्रिंट च्या ठस्यांचे शिक्के), बायोमॅट्रीक आधार संच लॉग इन करण्यासाठी आवश्यक असणारे आयरीस चे वेगवेगळ्या अँगल मधून कागदावर प्रिंट केलेले फोटो, नोटरी संजय वाहणे यांचे नोटरी करण्याचे साहित्य व सही केलेले व शिक्का असलेले हिरव्या रंगाचे लिगल साईजचे कोरे कागद, नाव बदल केलेले राजपत्र आदी साहित्य व इतर अनेक कागदपत्रे व रजिस्टर, आधारकार्ड कार्ड नोंदणीसाठी लागणारे लॅपटॉप, आयरीस स्कॅनर, फिंगर प्रिन्ट स्कॅनर, कॅमेरा, जीपीएस आदी साहित्य आढळले असून ते पोलिसांनी जप्त केले आहे.
ही कामगिरी दहशतवाद विरोधी शाखा,भोसरी पोलीसठाण्याचे निरीक्षक शिवाजी गवारे, उपनिरीक्षक अशोक केंद्रे, व अंमलदार खरात, सुषमा पाटील, प्रतिभा मुळे, सचिन जाधव, स्वामी नरवडे यांनी केली.
Discussion about this post