पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | पुण्याच्या पिंपरी येथील पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. रमेश भोंडे यांना कोची (केरळ) येथे दि. २३ ते २५ मार्च या कालावधीत संपन्न होणाऱ्या इंडियन Analytical Science Congress (ISASC) मध्ये सन्माननीय फेलोशिप दि. २४ मार्च रोजी देऊन गौरविण्यात येणार आहे. मधुमेह या विकारावर ते गेली पंचवीस वर्षे संशोधन करीत असून स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणार्या पेशींचे पुनर्जीवन हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा व संशोधनाचा विषय आहे.
आईच्या दुधातील मूळ पेशींवर त्यांनी केलेल्या संशोधनाने त्यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. मूळ पेशींवरील त्यांच्या संशोधनाप्रित्यर्थ अत्यंत प्रतिष्ठेचे टीएमए पै अध्यासन दोनदा मिळविण्याचा दुर्मिळ सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. डॉ. रमेश भोंडे यांचे सुमारे 250 शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 25 विद्यार्थ्यांनी Ph.D. प्राप्त केली आहे.
डॉ. रमेश भोंडे यांनी प्राणीशास्त्रातील पदवी फर्ग्युसन महाविद्यालयातून, M.Sc. पदवी पुणे विद्यापीठातून व Ph.D. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूविज्ञान प्रयोगशाळेतून मधून प्राप्त केली. पुणे विद्यापीठात वैज्ञानिक म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम पहिले.
बंगळूरस्थित स्टेमप्युटिक्स या संस्थेत तंत्रसंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मणिपाल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ रिजनरेटिव्ह मेडिसीन येथे अधिष्ठाता म्हणून पाच वर्षे त्यांनी अध्यापनही केले.
Discussion about this post