पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | धुलीवंदनादिवशी दुकानासमोर रंगाचे फुगे उडवू नका म्हटल्यावरून टोळक्याने दुकानदारास मारहाण करत त्याच्या अंगावरील कपडे फाडून टाकले. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर टोळक्यातील काहींनी दुकानात येऊन त्यांना तक्रार दिल्यास दुकान जाळून टाकण्याची तसेच फायरिंग करण्याची धमकी दिली. येरवडा गावठाणात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात रोहन गायकवाड, आदित्य सरोदे, शुभम शिंदे, साहिल उलादरी, मल्लेश यड्रामे, अनिकेत गमरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत 23 वर्षीय व्यावसायिक तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाचे गौरव जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. धुलीवंदनादिवशी शुभम शिंदे हा त्यांच्या दुकानासमोर रंगाचे फुगे उडवत होता.
त्यामुळे तक्रारदारांनी त्याला येथे फुगे उडवू नकोस असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने साथीदारांना बोलवत त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्या भावाला मारहाण करून त्याच्या अंगावरील कपडे फाडले. तक्रारदाराचे आई-वडील व काकी भांडण सोडविण्यास आल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तक्रारदार पोलीस चौकीत गेले असता आरोपींनी दुकानावर येऊन पोलिसात तक्रार केली तर दुकान जाळून टाकेल व फायरिंग करेल, अशी धमकी दिली आहे.
Discussion about this post