व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरामध्ये १ जुलैपासून प्लास्टिक बंदी लागू केली आहे. प्लास्टिकऐवजी कापडी व पर्यावरणपूरक वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
त्यासाठी महापालिकेकडून ‘स्वच्छता मोहीम’ राबवली जात आहे. त्याअंतर्गत जुन्या व वापरात नसलेल्या कपड्यांपासून नव्या पिशव्या तयार केल्या जाणार आहेत. यासाठी बचत गटाच्या माध्यमातून भोसरी आणि थेरगाव या ठिकाणी दोन युनिट सुरू केली आहेत. मशिन आणि शिवण यंत्रे उपलब्ध केली जाणार आहेत. तेथे जुन्या कपड्यांपासून नव्या पिशव्यांची शिलाई केली जाणार आहे.
शहरातील कचरा जमा करून तो मोशी येथील कचरा डेपोमध्ये नेला जातो. या कचऱ्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. मात्र, टाकाऊ कपड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी याठिकाणी यंत्रणा उपलब्ध नाही. तसेच कपड्यांचे विघटन होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे अशा प्रकारचा कचरा जमा करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचऱ्यामधील टाकाऊ कपडे वेगळे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३२ युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी वनराई या संस्थेला थेट पद्धतीने काम दिले आहे. वनराई ही संस्था शहरातील ३२ प्रभागांमध्ये ३२ युनिट बसवणार आहे. त्यांना एका युनिटसाठी ३२ हजार ५०० रुपये याप्रमाणे १० लाख ४० हजार रुपये देण्यात येणार आहेत.
३२ ठिकाणी व्हेंडिंग मशिन
प्लास्टिक बंदी असल्यामुळे प्रशासना च्यावतीने कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी शहरामध्ये ३२ ठिकाणी व्हेंडिंग मशिन लावण्यात येणार आहेत. यामध्ये पाच व दहा रुपयांचा कॉइन टाकल्यावर पिशवी मिळणार आहे. व्हेंडिंग मशिनवर क्युआर कोड देखील लावण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना फोन पे, गुगल पेद्वारे पैसे पाठवून पिशवी मशीनमधून घेता येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे.
Discussion about this post