Pune News : पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमितेश कुमार हे 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रितेश कुमार हे भारतीय पोलीस सेवेतील 1992 च्या बॅचचे अधिकारी आहेत. 16 डिसेंबर 2022 रोजी पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोक्का, तडीपार, एमपीडीए यांसारख्या कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाईची करण्यावर भर दिला होता.
पिंपरी चिंचवडचे सहपोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे आणि उपायुक्त काकासाहेब डोळे यांचीही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त डॉ.काकासाहेब डोळे यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथील पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
Discussion about this post