व्हीएसआरएस न्युज पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२१) :- चिखलीतील कुदळवाडी भागात स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्या पुढाकाराने कामगार, जेष्ठ नागरिक, महिलांसाठी मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
या मोहिमेचा शुभारंभ पालिकेच्या आकुर्डी रुग्णालयाच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवी, डॉ राहुल साळुंखे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. १८ वर्षांवरील तब्बल ३३० लाभार्थ्यांना पहिल्याच दिवशी कोविशिल्ड चा डोस देण्यात आला.
कुदळवाडीसह चिखली प्रभाग लसीकरणात शहरात आघाडीवर आहे. जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. परिसरातील लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड दाखवून मोठ्या संख्येने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन दिनेश यादव यांनी केले आहे.
देशात शुक्रवारी (27 ऑगस्ट) एकाच दिवशी जवळपास 79 लाख लोकांचे संध्याकाळी पाच पर्यंत कोविड-19 लसीकरण करण्यात आले असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.
एका दिवसातील आतापर्यंतचा हा उच्चांक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ट्वीट करत दिली आहे. आतपर्यंत एका दिवसातील लसीकरणाच्या आकडेवारीतील ही सर्वात जास्त संख्या आहे.
दरम्यान 21 ते 27 ऑगस्ट या आठवड्यात देशातील 4.5 कोटी नागिरकांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देखील आतापर्यंतचा उच्चांक आहे. ऑगस्ट महिन्यात लसीकरणाचा उच्चांक गाठण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात 15 कोटीहून अधिक कोरोनावरील लसीचे डोस देऊन लसीकरणाचा विक्रम गाठला आहे.
देशात सलग दुसऱ्या दिवशी 40 हजाराहून जास्त रुग्णसंख्येची भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 44 हजार 658 नव्या रुग्णांची भर पडली असून 496 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल 32 हजार 988 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी बुधवारी 46 हजार 164 रुग्णांची भर पडली होती तर 607 जणांचा मृत्यू झाला होता.
Discussion about this post