व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना शहरात डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुनगुनियाचा उद्रेक वाढत आहे. प्रत्येक घरातील एखाद-दुसर्या व्यक्तीला घसा, डोकेदुखी, खोकला, सर्दी व अंगदुखीची लक्षणे जाणवत असल्याचे चित्र शहरभर आहे.
कोरोनाचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आरोग्याची काळजी घेत असतानाही साथ आजारांचा फैलाव वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
आजपर्यंत शहरातील 4 हजार 628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 69 हजार 533 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 476 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 448 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
काय काळजी घ्याल?
डासांपासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवा.
ताप येताच वैद्यकीय सल्ला घ्या. कोणताही ताप अंगावर काढू नका
वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा. पौष्टिक आहार घ्या. लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा. धुम्रपान टाळा, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्या, हस्तांदोलन टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका, फ्ल्यु सर्दुश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि अवैद्यकिय कर्मचारी, गरोदर महिला, उच्च रक्तदाब व मधुमेह असलेले रुग्ण (अति जोखिमेचे रुग्ण) यांना महापालिकेच्या रुग्णांलयामध्ये स्वाईन फ्ल्यु (H1N1) प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे.(Swine flu) तर, महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नविन थेरगांव रुग्णालय, ह.भ.प.मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय(नविन आकुर्डी रुग्णालय), नविन भोसरी रुग्णालय व नविन जिजामाता रुग्णालय येथे अतिदक्षता विभागामध्ये दाखल असणा-या रुग्णांची स्वाईन फ्ल्यु तपासणी केली जाते.
Discussion about this post