व्हीएसआरएस न्युज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंसिबिलीटी (सीएसआर) विभागासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.
कंपनीत आयुक्तांसह 4 अधिकारी, महापौर, सत्तारूढ पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष व विरोधी पक्षनेत्यांसह सर्व गटनेत्यांचा समावेश असणार आहे.
मात्र, यापुढे कंपनीचे अध्यक्ष म्हणून आयुक्त काम पाहणार नाहीत. त्याऐवजी महापौर हे अध्यक्ष असणार आहे. त्याबाबतची उपसूचना महासभेत मंजूर करण्यात आली.
महापालिकेच्या सीएसआर विभागास सध्या वस्तू रूपात वर्षाला एकूण 8 ते 10 कोटी रूपयांचा निधी मिळतो. वस्तू रूपात मदत मिळत असल्याने पालिकेच्या उपक्रम व योजनांसाठी खर्च करता येत नाही. विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी कलम आठ या कायद्यानुसार स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव विभागाला दिला आहे.
कंपनीची स्थापना झाल्यास सीएसआर विभागास दरवर्षी 150 ते 175 कोटी रोख निधी महापालिकेस मिळणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. सीएसआर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र एसपीव्ही कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे.
Discussion about this post