व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने रेड झोन प्रतिबंधित क्षेत्रातील निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बसस्थानक व अप्पूघर येथे बेकायदेशीरपणे बांधकाम केले आहे. स्मार्ट सिटीने अनधिकृतरीत्या स्मार्ट टॉयलेट (स्वच्छतागृह) व व्यापारी गाळ्यांचे बांधकाम केले. ते बांधकाम पाडावे, या मागणीसाठी चिंचवड ऑटो क्लस्टर येथील स्मार्ट सिटीच्या कार्यालयासमोर गुरुवारी (दि. २४)लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
रेड झोन या लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नाही. अशा बांधकामावर महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र, महापालिकेच्याच स्मार्ट सिटीने रेड झोन भागात स्मार्ट टॉयलेट व व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम केले आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे. त्या तक्रारीवर कारवाई होत नसल्याने त्यांनी एक दिवसीय उपोषण आंदोलन केले.
आंदोलनात सचिन काळभोर ,पप्पू भोंडे, दीपक हाताळले, धम्मा हाताळले, हैदर शेख, रफीक शेख, राजेंद्र काळभोर, शिवाजी काळभोर आदींनी सहभाग घेतला.
ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रदेशाध्यक्ष वसंत जोगदंड, युवा कामगार जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, सोनाली वाघमारे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. स्मार्ट सिटीचे अधिकारी, सल्लागार व ठेकेदार यांनी संगनमत करून स्मार्ट टॉयलेटचा घाट घातला असल्याचा आरोप काळभोर यांनी केला.
Discussion about this post