व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी / प्रतिनिधी
असंघटित कामगार, कष्टकर्यांना आर्थिक विंवचनेतून बाहेर काढणे गरजेचे आहे. या घटकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायत व कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे केली.
या वेळी लवकरच महामंडळ स्थापन करून कष्टकर्यांना न्याय देऊ, घरेलू कामगारांसाठीच्या मंडळाला निधी देऊ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सफाई कामगार यांच्या प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करू रिक्षा चालक मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करु असे आश्वासन मंत्री सुरेश खाडे यांनी मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांच्यासोबत असंघटित, सफाई कामगार आदींसह कष्टकर्यांच्या रखडलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई मंत्रालय येथे आयोजित बैठकीत मंत्री सुरेश खाडे यांनी बाबा कांबळे यांना कष्टकर्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन दिले.
या बैठकीस,
या वेळी मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट युनियन मुंबई अध्यक्ष जावेद देऊळकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायत मुंबई प्रदेशाध्यक्ष विजय देसाई, कार्याध्यक्ष साजिद सय्यद, ठाणे जिल्हा अध्यक्ष आशिष देशपांडे, कल्याण डोंबिवली अध्यक्ष शिवाजी गोरे, मुंबई संघटक अक्षय साळवे, मुंबई कार्यकारणी सदस्य फायाज शेख, रईज खान, ताहीर मुजावर, आदी उपस्थित होते.
या बैठकीत बाबा कांबळे यांनी रखडलेले विविध प्रश्न मंत्री सुरेश खाडे यांच्या समोर मांडले. ते म्हणाले की, देशात 45 कोटी तर महाराष्ट्रामध्ये चार कोटी पेक्षा अधिक संघटित कामगार, कष्टकरी आहेत. यामध्ये शेतमजूर, वीट भट्टी कामगार, फळबाजी विक्रेते, दुकान मॉलमधील सफाई कामगार आदीसह गोरगरीब घटकांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये बांधकाम मजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन झाला आहे. या मंडळामध्ये हजारो कोटी रुपये जमा आहेत. याबरोबर घरेलू कामगार, धुणी भांडी काम करणार्या महिलांसाठी देखील मंडळ स्थापन झाले आहे. या मंडळामध्ये मात्र पैसे नसल्यामुळे त्यांना कोणत्याही स्वरूपाचे लाभ मिळत नाहीत. या कष्टकर्यांना कुठल्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा देणारा कायदा नाही. त्यांना निवृत्तीवेतन, म्हातारपणी पेन्शन, मुलांना उच्च शिक्षण अशा स्वरूपाच्या सामाजिक सेवा मिळाव्यात कोविडनंतर या कष्टकर्यांचे सर्वात अधिक हाल झाले आहे. अनेकांचे जगणे मुश्किल झाले असून ते कसाबसा संसार उभा करत आहेत. या परिस्थितीमध्ये हातावर पोट असणार्या कष्टकरी घटकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायत व कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.
या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील कंत्राटी पद्धतीने काम करणार्या साफसफाई महिला कामगारांवरील अन्याय दुर करणे,सफाई कामगार महिलांना नोकरीमध्ये कायम करण्यात यावे,खासगी शाळांमधील मोठा खर्च कमी करून कष्टकरी कामगारांच्या मुलांना परवडणारे शैक्षणिक धोरण राबविणे, पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसीत काम करणार्या कंपन्यांमधील कामगारांची कपात रोखणे, यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी असंघटित कामगार, कष्टकरी जनतेसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी शिष्टमंडळाला दिले. रिक्षा चालकांसाठी होऊ घातलेल्या कल्याणकारी मंडळाबाबत देखील या वेळी सकारात्मक चर्चा करण्यात आल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.
Discussion about this post