व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदपथ व सायकल ट्रॅकवर अनाधिकृतपणे किंवा अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर व अतिक्रमणांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४३-अ (१), २०८ व ३९२(१) नुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी अतिक्रमण विभाग व अतिक्रमण निरीक्षकांना गुरुवारी दिला.
पिंपरी चिंचवड शहरातील पदपथ व सायकल ट्रॅक नागरिकांना वापर करण्यासाठी उपलब्ध करून देण्याची महानगरपालिकेची जबाबदारी आहे. तथापि, शहरातील बहुतांश पदपथ व सायकल ट्रॅकवर नागरिक अनाधिकृतपणे किंवा अतिक्रमण करून वाहने उभी करतात. यामुळे नागरिकांना पदपथावर चालतांना व सायकल ट्रॅकवर सायकल चालवतांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पदपथ व सायकल ट्रॅकवर अनाधिकृतपणे किंवा अतिक्रमण करून पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करणे व अतिक्रमण निष्काशीत करणे आवश्यक आहे.
सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरीक्षकांनी क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील धडक पथकामार्फत कारवाई करुन आपल्या क्षेत्रातील सर्व पदपथ लोकांना चालण्यास सुरक्षित व सुस्थितीत रिकामे राहतील, याची दक्षता घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी पदपथावर वाहने पार्क केली असतील किंवा अतिक्रमण असेल त्यावर दंडात्मक कारवाई करावी, त्याबाबतचा अहवाल सह शहर अभियंता ( अतिक्रमण ) यांचेमार्फत आयुक्त कार्यालयाकडे देण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे.
Discussion about this post