व्हीएसआरएस मराठी न्युज –
पक्षपात करण्याचा आरोप करीत इंडिया आघाडीने विविध वृत्तवाहिन्यांच्या १४ अँकर्सवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करत त्यांची यादी जाहीर केली आहे. यापुढे इंडिया आघाडीचे कोणीही या १४ अँकर्सच्या शोमध्ये सहभागी होणार नाही, असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी जाहीर केले आहे.
खेरा यांनी समाजमाध्यमांवर ही यादी जाहीर करताना म्हटले आहे की, इंडिया आघाडीच्या माध्यम समितीच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे १४ न्यूज अँकर्सच्या शोमध्ये इंडिया आघाडीचा कोणताही प्रवक्ता सहभागी होणार नाही. या अँकर्सच्या यादीत आदिती त्यागी, अमन चोप्रा, अमिश देवगण, आनंद नरसिंहा, अर्णब गोस्वामी, अशोक श्रीवास्तव, चित्रा त्रिपाठी, गौरव सावंत, नाविका कुमार, प्राची पाराशर, रुबिका लियाकत, शिव अरूर, सुधीर चौधरी आणि सुशांत सिन्हा यांचा समावेश आहे.
बुधवारी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत काही टेलिव्हिजन अँकर्सच्या शोवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गुरुवारी त्या अँकर्सची यादीच जाहीर करण्यात आली. पवन खेरा म्हणाले की, काही वृत्तवाहिन्या द्वेषाचे वातावरण तयार करीत आहेत. त्यांच्यामुळे समाजात हिंसेचे वातावरण तयार होत असल्याने इंडिया आघाडीने हा निर्णय घेतला.
Discussion about this post