अयोध्या : अयोध्येत वैदिक मंत्रोच्चारात आज दि. २२ जानेवारी रोजी श्रीरामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशातील जनता या क्षणाची आतुरतेने वाट पहात होती. त्याची आज पूर्ती झाली आहे.
प्राणप्रतिष्ठा होत असताना मंदिराच्या गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी,आरएसएस प्रमुख मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मूर्तीकार अरूण योगीराज उपस्थित होते.
प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी श्रीरामाची विधीवत पूजा केली.त्यानंतर उपस्थितांनी श्रीरामाचा जयघोष केला. वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर परिसरावर पुष्पवृष्टी केली.
अयोध्येत अभिषेक सोहळा पूर्ण झाला असून त्यासोबतच लोकांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षाही संपली आहे. रामललाला गर्भगृहात बसवण्यात आले असून त्यांचे पहिले चित्र समोर आले आहे. चित्रात रामललाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात मोत्याचा हार आहे. याशिवाय कानात झुमके शोभतात. त्यांच्या हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण असून राम लल्ला पिवळ्या रंगाचे धोतर परिधान केलेले दिसत आहेत.
ही मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी शालिग्राम खडकापासून बनवली आहे.धार्मिक ग्रंथांमध्ये शालिग्राम हे भगवान विष्णूचे रूप मानले गेले आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले गेले आहेत. शालिग्राम खडकाचे वय हजारो वर्षे आहे. हे पाणी प्रतिरोधक आहे. चंदन आणि रोळी लावल्याने मूर्तीच्या चकाकीवर परिणाम होत नाही.
रामललाच्या मूर्तीची एकूण उंची पायापासून टोकापर्यंत 51 इंच असून तिचे वजन सुमारे 200 किलो आहे. रामललाची जुनी मूर्ती अयोध्येच्या पंचकोशी परिक्रमेला प्रदक्षिणा घालून येथील मंदिरांमध्ये नेण्यात येणार आहे. यानंतर ती मूर्तीही नवीन मूर्तीसोबत राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली.
Discussion about this post