व्हीएसआरएस मराठी न्युज –शिवराय मनामनात,शिवजयंती घराघरात, या भव्य संकल्पनेतून शिवजयंती जगभरातील ७५ देशात साजरी करण्यात येते. वाळवंटात वसलेले स्वर्ग म्हणजे दुबई येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच, दुबई आणि सत्यशोधक,दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सलग ९ व्या वर्षी दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दुबई येथील शिवजयंतीसाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रेरणादायी वक्ते प्रा नितीन बानुगडे पाटील हे उपस्थित होते.
शिवजयंती सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करुन आणि जिजाऊ वंदना गायनाने झाली. मुकुंदराज पाटील यांनी दणदणीत शिवगर्जना वातावरण स्फुर्तीदायी बनवून टाकले. थोड्या वेळासाठी तर आपण रायगडावर वास्तव्यास आहोत आणि शिवगर्जना ऐकत असल्याचं उपस्थित लोकांना जाणवलं.
प्रमुख वक्ते प्रा नितीन बानुगडे पाटील यांनी “शिवराय आणि व्यवस्थापन” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
या त्यांच्या भाषणाने दुबईकर अतिशय भारावून गेले. भाषणादरम्यान वेळोवेळी शिवरायांचा जयघोष करण्यात येत होता. स्वराज्य स्थापन करण्याची कल्पना जिजाऊ, शहाजी राजेंच्या डोक्यात कशी आली अन मग ती सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी कशी तयारी केली, हे प्रा बानुगडे पाटील यांनी इतिहासाचे दाखले देत सर्वांना समजून सांगितले. आपण आपल्या मुलांच्या चिकित्सक बुद्धीला कुठे हि आळा घालु नये, त्यांच्या छोट्या छोटया शंकांचं तेंव्हाच निरसन करावे,असे त्यांनी प्रतिपादन केले. आपण आणि यश यामध्ये मनातील भीतीचा एक पातळ पडदा आहे, ज्यामुळे विजयाच्या जवळ असूनही आपण स्वतः स्वतः चा पराभव करतो. ह्या जगात अशक्य असं काहीच नाही, फक्त प्रयत्न आणि चोख नियोजन करनं गरजेचं आहे, असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज कसे जिज्ञासू होते व त्यातूनच सुरतेला भारतातील पहिला छपाई खाना चालू झाला हि माहिती दिली. जे लोक दुसऱ्यावर अवलंबून राहतात, ते कधीही विजयी होत नाहीत उलट जे लोक स्वतः वर विश्वास ठेवून स्वतः वर अवलंबून राहतात ते सतत विजयी होतात, असे सांगितले. छत्रपती शिवरायांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आलेत परंतू त्यांनी कधीही दुसऱ्याला पुढे न करता, स्वतः सर्व संकटांचा सामना केला. तत्कालीन परिस्थिती मध्ये हे प्रथमच घडत होतें, लढाई मध्ये शिवाजी राजे सर्वात पुढे राहून नेतृत्व करायचे आणि त्यामुळे प्रेरित होऊन मावळे सुद्धा जीवाची पर्वा न करता लढत असत.
ह्या वर्षीच्या शिवजयंती मध्ये एक सुंदर असं “आजची भोंदूगिरी आणि महापुरुषांचा वारसा” हे नाटक सादर करण्यात आलं. या नाटकाच्या माध्यमातून आपण महापुरुषांचे विचार समजून घेतले तर जीवनात नैराश्याचा सामना करताना भोंदू बाबांच्या लोक आहारी जाणार नाही हे सांगण्यात आले.नाटकातील सर्व कलाकारांनी अतिशय सुरेख अभिनय केला.प्रत्येक प्रसंगाला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळत होती.नाटकातील मावळे, मोबाईल बाबा,आदित्य,प्राजक्ता व महापुरुष ही पात्रे सर्वांच्या पसंतीस खरी उतरली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंकज आवटे यांनी सत्यशोधक म्हणजे काय,त्यांची कार्य याविषयी माहिती दिली. आतापर्यंतचा ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंच व सत्यशोधक दुबई’ यांचा प्रवास सर्वांसमोर सादर केला.तदनंतर रामेश्वर कोहकडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
या शिवजयंती निमित्त उत्कृष्ठ भाषणकला किंवा पोवाडा या लहान मुलांसाठीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्व विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम स्थळी विविध सामाजिक संदेश देणारी भित्तिपत्रके लावण्यात आली होती व ती सर्वांचं लक्ष्य वेधत होती.कार्यक्रम स्थळी जिजाऊ शिवरायांची अतिशय सुंदर फ्लेक्स व सेल्फी पॉईंट, विक्रम भोसले यांनी बनवून घेतली होती. तसेच दुबई येथे वाचन संस्कृती तयार व्हावी यासाठी “शिवग्रंथ पेटी आपल्या दारी” हा विशेष उपक्रम दुबई येथे राबवण्यात येतो, त्यातील सर्व पुस्तके येथे शिवप्रेमींसाठी उपलब्ध होती. तसेच प्रेक्षकांना ” बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ” हे पुस्तक वाटप करण्यात आले. या वर्षी शिवजयंती मध्ये दुबई मधील भारतीय उद्योजकांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे या उद्योजकांपैकी जाई कदम-सुर्वे व सुनीता देशमुख या महिला उद्योजक होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट पद्धतीने रामेश्वर कोहकडे यांनी केले. सर्वांनी त्यांचे कौतुक केले. कार्यक्रम ऑनलाईन करण्याची जबाबदारी आशिष जीवने सर यांनी व्यवस्थित पार पाडली तसेच एस जे लाईव्ह च्या माध्यमातून सागर जाधव यांनीसुद्धा हा कार्यक्रम हजारो शिवप्रेमी पर्यंत पोहचवला. शेवटी पंकज आवटे यांनी आभार व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशिष जीवने,अमोल कोचळे (नेदरलँड्स हुन), जयंत रंगारी, विक्रम भोसले,विजयसिंह शिंदे, संतोष सपकाळे,सुनंदा सपकाळे,मुकुंदराज पाटील, निखिल गणूचे,अभिजित देशमुख,जितू सपकाळे,दिपक जोगदंड,रामेश्वर कोहकड़े व पंकज आवटे यांनी अथक आणि विशेष परिश्रम घेतले.
या दुबई येथे सलग ९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी – संयुक्त अरब अमिराती मधील दुबई,अबुधाबी,शारजाह, अजमान, फुजेराह, रास अल खैमा येथून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Discussion about this post