Himachal : नवी दिल्ली : हिमाचलप्रदेश विधानसभेतील काँग्रेसच्या ६ आमदारांना पक्षादेश डावलल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले असून पक्षांतरबंदी कायद्यानुसार या सहा आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
विधानसभाध्यक्ष सत्पाल पठानिया यांनी ही कारवाई केली.
ज्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे त्यात धर्मशालाचे आमदार सुधीर शर्मा, सुजानपूरचे आमदार राजेंद्र राणा, कुतलाहारचे आमदार देवेंद्र भुट्टो, गाग्रेटचे आमदार चैतन्य शर्मा, लाहौल स्पितीचे आमदार रवी ठाकूर आणि बारसरचे आमदार इंद्र दत्त लखनपाल यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असलेल्या हिमाचलप्रदेश विधानसभेत काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉसव्होटींग केल्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे निष्ठावंत अभिषेक मनू सिंघवी यांना पराभव पत्करावा लागला. भाजपचे हर्ष महाजन निवडून आले.
सिंघवी आणि महाजन यांना समसमान म्हणजेच ३४ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढून निकाल घोषित करण्यात आला. या चिठ्ठीमुळे भाजपचे महाजन जिंकले.
हिमाचल प्रदेशमध्ये कॉग्रेस-४०, भाजप-२५, अपक्ष-३ असे पक्षीय बलाबल आहे. त्यापैकी कॉंग्रेसचे ४० आणि ३ अपक्ष अशा ४३ जणांचा पाठींबा सुखविंदरसिंग सुखु सरकारला आहे असे असले तरीही एकूण ९ आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याने आणि एका मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर आता सरकारकडे फक्त ३३ आमदार राहिले आहेत. सरकार अल्पमतात आले आहे असा दावा भाजपने केला आहे.
Discussion about this post