व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –खेड:-आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांची सुन प्रियंका हिने रविवारी (१० जुलै) संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे आळंदी परिसरात एकच खळबळ उडाली होती. लग्नातील उर्वरित फर्निचर व इतर वस्तुंसाठी नवरा, सासु व सासरे प्रियंकाला मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यानुसार आळंदी पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींना अटक करून त्यांना गुरुवारी खेड न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी निगडीतील अनेक संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रियांकाला न्याय मिळण्यासाठी व आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी आक्रमक झाल्या. यावेळी पोलिसांची मोठी दमछाक झाली.
गुरुवारी खेड न्यायालयात आरोपी उमरगेकर कुटुंबियांना हजर केले असता निगडीतील अनेक संतप्त महिलांनी थेट खेड न्यायालय गाठत आरोपींच्या अंगावर धावुन जात जोरदार घोषणाबाजी केली. “निष्पाप प्रियांकाला न्याय द्या न्याय द्या, आरोपींना कडक शिक्षा द्या” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी आरोपींच्या सुरक्षेची जबाबदारी घेत असताना महिला पोलिसांची ज्यादा कुमक मागवुन घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
Discussion about this post