व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -आयपीएलमधील खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांनी मंगळवारी रात्री 11:50 च्या सुमारास ताज हॉटेलजवळ आयपीएलमधील संघासाठी आलेली बस फोडली. आयपीएल सामन्याच्या सरावासाठी आलेल्या संघातील खेळाडूंची हॉटेल ते स्टेडियम ने- आण करण्यासाठी बसची व्यवस्था असते. अनेकदा इशारा देउनही मुंबईतील मराठी वाहतूक व्यवसायिकांना हे काम देण्यात आलेलं नाही, असा आरोप मनसेने केलाय.
मराठी व्यावसायिकांऐवजी दिल्लीतील व्यावसायिकांना कामाचे कंत्राट दिले जाते, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केलाय. प्रशांत गांधी यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी मंगळवारी रात्री या बसच्या काचा आणि दिवे फोडले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’ अशा घोषणा देत बसवर ‘मनसे दणका’ असे स्टिकर्स चिकटवीत लाकडी दांडक्याने बसच्या काचा फोडल्या.
आयपीएलचा 15 हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई- कोलकाता यांच्यात रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न तर नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर सामने खेळवले जाणार आहेत.
Discussion about this post