व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी: समता सैनिक दलाचे वतीने उद्या सोमवारी भव्य दुचाकी व चारचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती समता सैनिक दलाचे दिनेश बनसोडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
समता सैनिक दलाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जागरूक नागरिक होऊन प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा,मतदानासाठी दिलेली सुट्टी साजरी न करता त्याचा मतदानासाठी उपयोग करण्यात यावा, तसेच लोकशाहीमध्ये मतदानाने मतदारांना आपला लोकप्रतिनिधी ठरवण्याचा हक्क दिला आहे.योग्य उमेदवाराची निवड कशी गरजेची आहे. यासाठी रॅलीमध्ये विशेष जनजागृती करण्यात येणार आहे.
दरम्यान, सोमवार दि.०२ ऑक्टो २०२३ रोजी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा (पिंपरी चिंचवड युनिट) यांच्या नेतृत्वाखाली या महा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीमध्ये एकूण दुचाकी-२०६, तीनचाकी -२०६ व चारचाकी-२०६ वाहनांचा समावेश असणार आहे. रॅलीची सुरुवात दुपारी ०२:०० वाजता करण्यात येणार असून रॅलीचा मार्ग हा पिंपरी एचए ग्राऊंड, संत तुकाराम नगर मार्गे हायवे, दापोडी युटर्न, पिंपरी – चिंचवड हायवे, निगडी मधुकर पवळे उड्डाण पूल राईट टर्न, थरमॅक्स चौक, केएसबी चौक, मोरवाडी कोर्ट, लालटोपी नगर, अजमेरा नगर मार्गे, एच.ए. ग्राऊंड पार्किंग ते चालत भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी असा असणार आहे.स्मारकाच्या मागे असणाऱ्या मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात येईल.
या समारोप सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा.भिमराव यशवंत आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत.
Discussion about this post