Mumbai News : मुंबई : मुंबई पोलिसांच्या मोटार वाहतूक विभागातील आठ महिला कॉन्स्टेबल्सनी लिहिले आहे असे भासणार्या एका पत्रामुळे सध्या पोलिसदलात एकच खळबळ माजली आहे.
या पत्राची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या आठ कॉन्स्टेबल्सपैकी काहींनी या पत्रावरील सह्या आपल्या नसल्याचा खुलासा वरिष्ठांकडे केला आहे.
मोटार वाहन विभागातील एक उपायुक्त आणि दोन निरीक्षकांनी बलात्कार, लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळ केला जात असल्याचे या पत्रात म्हटले असून हे पत्र स्पीडपोस्टद्वारे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाठवलेले आहे. यामध्ये तीन अधिकार्यांनी त्या महिला कॉन्स्टेबल्सवर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओही शूट केला. त्या आधारे आता त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा उल्लेख या पत्रात आहे. तसेच सरकारी वाहनातून घरी नेऊन बलात्कार करण्यात आल्याचा तसेच एका महिलेवर अधिकार्याच्या केबिनमध्येच बलात्कार झाल्याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला असून या तिन्ही अधिकार्यांचे मोबाईल जप्त करून सीबीआयद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने मुंबई पोलिस विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. सह पोलिस आयुक्त, एस जयकुमार (प्रशासन), म्हणाले, “सुरुवातीला आम्ही बलात्काराच्या आरोपांची चौकशी करत होतो. परंतु आठ महिला कॉन्स्टेबल चालकांना या पत्रासंदर्भात विचारले असता त्यांनी असे कोणतेही पत्र लिहिल्याचा इन्कार केला. त्यामुळे आता पत्र लिहिणार्या व्यक्तीचा शोधही आम्ही घेत आहोत.
हे पत्र व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबल्सना नातेवाईक, हितचिंतक आणि पोलीस अधिकार्यांकडून कॉल्स येऊ लागल्याने त्या हैराण झाल्या आहेत.
Discussion about this post